Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी देशातील काही भागांमध्ये मतदान पार पडणार आहे. यासाठी उरलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कल्पना लढवताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं नाते पाहायला मिळतं आहे. कार्यकर्ते कधी उत्साहाच्या भरात असं काही करतात प्रसंगी त्यांना मार देखील खावा लागतो. मात्र चंदीगडमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे आमदाराचे डोकं फुटलं आहे. कार्यकर्त्यांच्या नादात चंदीगडमध्ये एक उमेदावर गंभीर जखमी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, अंतिम टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे विविध पक्षांचे नेते सतत रॅली आणि जाहीर सभा घेताना दिसत आहेत. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा चंदीगडमध्ये गंभीर अपघात झाला. बहुजन समाज पक्षाने चंदीगड लोकसभा मतदारसंघातून डॉ. रितू सिंह यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यासाठी बसपाच्या उमेदवार डॉ.रितू सिंग यांना वजन काट्यावर बसवून नाण्यांनी तोलले जात होते. यादरम्यान अचानक काटा खाली आला आणि त्या जमिनीवर पडल्या. त्यामुळे डॉ.रितू सिंग यांचे डोके फुटले.
लाकडी काट्याचा काही भाग तुटून रितू सिंग यांच्या डोक्यावर आदळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थक घाबरले आणि त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधल्याचा फोटो समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
दरम्यान, बसपने चंदीगडमध्ये डॉ. रितू सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही जागा जिंकणार असल्याचा दावा बसपाचा आहे. रित सिंग यांची लढत भाजपचे संजय टंडन आणि काँग्रेसचे मनीष तिवारी यांच्याशी आहे. तसेच त्यांच्यासमोर शिरोमणी अकाली दलाचे हरदेव सैनीदेखील रिंगणात आहेत.चंदीगडमध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे. डॉ. रितू सिंग या दिल्लीच्या माजी प्राध्यापिका आहेत. त्यांच्या प्रोफाइलनुसार, त्या एक मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.