नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नाचे अनेक भन्नाट किस्से हे सातत्याने समोर येत असतात. गुजरातमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या वहिनीसोबत लग्न केल्य़ाची अजब घटना घडली. तरुणीने नवरदेवाच्या सर्व विधी पूर्ण केल्या. मंडपात सप्तपदी घेतल्या आणि पाठवणी करून घरी घेऊन आले. यानंतर एक मजेशीर गोष्ट घडली. तरुणीने ज्या वहिनीला नवरी बनवून घरी आणलं होतं, तिला आपल्या भावाला सोपवलं. तुम्हालाही हे ऐकून थोडा धक्का बसला असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हा सर्व एका परंपरेचा भाग आहे. या जिल्ह्यात तीन गावं म्हणजेच सनाडा, सूरखेडा आणि अंबाला येथील ही परंपरा आहे. येथे लग्नाचे विधी वेगळ्या पद्धतीने केले जातात. येथे नवरदेव कधीच लग्न करण्यासाठी जात नाही, तर त्या बदल्यात नवऱ्याची बहिणी नवरदेव बनून जाते. आपल्या होणाऱ्या वहिनीसोबत लग्न करते आणि तिची पाठवणी करून घरी घेऊन येते. यानंतर आपल्या वहिनीला भावाकडे सोपवते.
उदेपूर जिल्ह्यात अंबाला गावात राहणारे हरिसिंग रायसिंग राठवाचा मुलगा नरेशचं लग्न फेरकुवा गावातील बजलिया हिमंता राठवा यांच्या मुलीसोबत ठरलं होतं. जेव्हा नरेशने सांगितलं की, त्यांच्या आराध्य देवामुळे ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. तर मुलीकडचे आधुनिकता सोडून परंपरेने लग्न करण्यासाठी तयार झाले. नरेशच्या वडिलांनीही सांगितलं की, दरम्यान तीन कुटुंबाने परंपरा सोडून नव्या पद्धतीने लग्न केलं. मात्र काही कारणांनंतर तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. यासाठी संपूर्ण गाव जुन्या परंपरेने विवाहाच्या विधी पूर्ण करतात.
तीन गाव आदिवासी बहुल आहेत आणि येथे लोक भरमादेवाला आपलं आराध्य दैवत मानतात. अशी मान्यता आहे की, भरमादेव कुमार आहेत. त्यामुळे आदिवासीदेखील मुलाची वरात घेऊन जात नाही. त्यांचं म्हणणं आहे की, जर असं केलं तर आराध्य देव नाराज होतील. यासाठी ते नवरदेवाच्या ऐवजी बहिणीला लग्नासाठी पाठवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.