गोवा: कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोव्यात येणाऱ्या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतातील लोकांनी पर्यटनासाठी गोव्यात जरुर यावे. मात्र, यावेळी त्यांनी काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे. पर्यटकांनी रस्त्यावर लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रीकर म्हणाले.काही दिवसांपूर्वी मिरामार-दोनापॉल मार्गावर एक पर्यटक बसमधून लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांना धारेवर धरले होते. हे पर्यटक म्हणजे 'पृथ्वीवरची घाण' आहेत, असे त्यांनी म्हटले होते. सरदेसाई यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी सरकारची भूमिका मांडली. सरदेसाई यांना पर्यटकांविषयी जे काही म्हणायचे होते, त्यामागील हेतू योग्य असावा. फक्त त्यांनी वापरलेली भाषा कठोर होती. त्यामुळे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, सरदेसाई यांनी स्वत:हून त्याविषयी दिलगिरी व्यक्त केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले. तसेच सध्या गोव्यात ज्या साधनसुविधा आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
गोव्यात या, पण रस्त्यावर लघवी करू नका- मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 8:25 AM