मुंबई : देशहितासाठी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री जाहीर केला. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. काळ््या पैशाला लगाम लावण्यासाठी पंतप्रधानांनी हा जालीम उपाय केल्याचे तज्ज्ञांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे.व्यवहारामध्ये थोडी अडचण होणार असली, तरी देशहितासाठी हा सर्वात महत्त्वाचा असल्याचे मत फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे (फॅम) अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी व्यक्त केले. गुरूनानी म्हणाले की, व्यवहारात थोडासा त्रास होणार असला, तरी देशहितासाठी या निर्णयाचे स्वागत करायला हवे. व्यापाऱ्यांचे बरेचसे व्यवहार रोखीने चालतात. त्यामुळे पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बदल करण्यासाठी व्यापाऱ्यांना विशेष मदत करण्याची गरज आहे. विशेषत: मोठ्या रक्कमेची चौकशी करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा मानसिक छळ बँकेमध्ये करू नये, असे आदेशही सरकारने देणे अपेक्षित आहे.चलनातील अतिरिक्त पैसा बँकेत आणण्यासाठी या निर्णयाची मोलाची मदत होईल, अशी प्रतिक्रिया बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे. उटगी म्हणाले की, पंतप्रधानांच्या आदेशामुळे बँकेमध्ये लोकांच्या रांगा लागणार आहेत. मात्र त्यामुळे काळा पैसाही बँकेत येईल. मुळात दर आठवड्याला रिझर्व्ह बँक चलनातील पैशांचा हिशेब ठेवत असते. मात्र लपून असलेला काळा पैसा या निमित्ताने बाहेर पडेल. अवघ्या ५० दिवसांत नोटा बदलून द्यावा लागणार असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासेल. शिवाय पाचशे व हजार यांहून अधिक किंमतीची नोट बाजारात नाही. त्यामुळे १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांची संख्या कमी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ५०० किंवा १ हजार रुपयांच्या नोटा बदलून देताना कमी किंमतीच्या नोटा संपल्यास बँकेत गोंधळ होऊ शकतो. (प्रतिनिधी)क्रांतीकारक निर्णय हजार व पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा सरकारचा निर्णय कांतिकारक आहे. त्यामुळे दोन हेतू साधता येतील. पहिला म्हणजे काळया पैशाला लगाम बसेल व दुसरा म्हणजे बनावट नोटांना पायबंद बसेल. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर काळ्या पैशाला आळा बसवा यासाठी स्वेच्छा योजना आखली होती. मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे सरकारने हे कठोेर पाऊल उचलले. ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सामान्यांना त्रास होईल. परंतु, देशाच्या भल्यासाठी सामान्य नागरिक हा त्रास सहन करतील. बनावट नोटांचा वापर करून दहशतवादी आपल्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या निर्णयाने हे कृत्य करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसेल.- अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकीलनोटांचे टेन्शन अन् हास्याचा फुलबाजा!केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियात विनोदाला उधाण आले आहे. नोटा जपून ठेवण्याच्या गृहिणींच्या सवयीशी सांगड घालत विनोद तयार केले. त्यातील काही विनोद.आता आहेर परत १०१ रुपयांवर येणार. आज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंत.काही मित्र तर उधार द्यायला फोन करीत आहेत. म्हणतात आरामात नंतर दे... काही घाई नाही. ज्या गृहिणींनी नवऱ्यापासून नोटा लपवून ठेवल्या होत्या त्या नोटा पुन्हा बाहेर येणार. मोेदींनी केला त्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ पुणेरी पाटी... येथे हजार पाचशेंच्या नोटांची रद्दी घेतली जाईल. अमेरिका मोजतोय व्होट, भारत मोजतोय नोट. निवडणुका तोंडावर आहेत. मतदारांना काय वाटणार? चेक की डेबिट कार्ड. १०० ची नोट म्हणाली, किसीको छोटा मत समजना...!अशा प्रकारचे उपाय योजत असताना गुप्तता पाळणे हिच यशाची गुरुकिल्ली असते, असे सांगून पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले, मी आत्ता हे तुमच्याशी बोलत असताना बँका, पोस्ट आॅफिसे, रेल्वे, इस्पितळे या व इतर संस्थांना याविषयी कळविण्यात येत आहे. यासाठी रिझर्व्ह बँक, इतर बँका, पोस्ट आॅफिसे यांना अल्पावधीत बरीच व्यवस्था करावी लागणार आहे.यासाठी त्यांना थोडा वेळ हा लागणारच. म्हणूनच ९ नोव्हेंबर रोजी सर्व बँका लोकांना व्यवहारांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे तुमची गैरसोय होऊ शकते. पण बँका व पोस्ट आॅफिसे हे राष्ट्रीय महत्वाचे काम यशस्वीपणे पार पाडतील याविषयी मला पूर्ण विश्वास आहे. तरी लोकांना संयम ठेवून व निर्धाराने बँका व पोस्ट आॅफिसांना सहकार्य करावे, असे माझे आवाहन आहे.पंतप्रधानांचे भावनिक आवाहनमोदी यांनी भाषणाच्या अखेरीस जनतेला पुढील शब्दांत भावनिक आवाहन केले-‘सामान्य लोकांना एकीकडे सोय व अप्रामाणिकपणा व दुसरीकडे गैरसोय आणि अप्रामाणिकपणा यामध्ये निवड करण्याची वेळ येते तेव्हा ते नेहमीच गैरसोय सोसणे पसंत करतात व अप्रामाणिकपणाला कधीही साथ देत नाहीत, असा माझा अनुभव आहे.दिवाळीत तुम्ही जसा तुमचा परिसर स्वच्छ केलात, तसा देश स्वच्छ करण्याच्या या महान कामात खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे या, असे मी आवाहन करीत आहे. तात्पुरत्या गैरसोयीकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करुया.सचोटी आणि विश्वासार्हतेच्या या उत्सवात सहभागी होऊ या.भावी पिढ्यांना त्यांचे आयुष्य ताठ मानेने जगता येईल याची व्यवस्था करू या.भ्रष्टाचार आणि काळ््या पैशाविरुद्ध लढा देऊ या.देशाच्या संपत्तीचा गरिबांना लाभ मिळेल याची खात्री करू या.कायदा पाळणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळू द्या.देशाच्या १२५ कोटी जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे व देश या लढ्यात यशस्वी होईल याची मला खात्री आहे.’निर्णय कठीण, पण वेळेवर : अमित शहानवी दिल्ली : काळ्या पैशांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय कठीण अन् वेळेवर घेतला असल्याचे म्हटले आहे. अमित शहा म्हणाले की, मोदी यांनी जो शब्द दिला होता तो कृतीत आणून दाखविला. मोदींच्या या घोषणेमुळे भ्रष्टाचार, काळा पैसा, हवाला आणि नकली नोटा यांच्या रॅकेटचे उच्चाटन होईल. गरीब, मध्यमवर्गीय यांच्या समृद्धीसाठी एक मार्ग तयार करावा लागेल. मोदी यांच्या या निर्णयाचा आम्हाला अभिमान आहे. विकासाच्या प्रवासात आम्ही काळ्या पैशांचा अडथळा येऊ देणार नाही. भविष्यातील पिढीसाठी आम्ही एक समृद्ध भारत घडवू इच्छितो. काळा पैसा हटविल्यामुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असे टिष्ट्वटही शहा यांनी केले आहे. भारताच्या भूमीत जे अमली पदार्थांचा व्यापार करतात आणि नकली नोटांचे रॅकेट चालवितात त्यांचाही या माध्यमातून बंदोबस्त करण्यात आला आहे. मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम काळ्या पैशांबाबत एसआयटी स्थापन करून आपले भविष्यातील लक्ष्य काय असेल याचे संकेत दिले होते.आश्वासन पाळण्याच्या दिशेने एक पाऊलनिवडणुकीनिमित्त केलेल्या घोषणा अंमलात आणण्याच्या दिशेने सरकारने एक पाऊल उचलले आहे. मात्र केवळ नोटा बंद करून काळया पैशाला आळा बसणार नाही. त्यासाठी आणखी वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत.- अॅड. उदय वारुंजीकरनिवडणुकीत काळ््या पैशाला लगामसध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा जो धुमाकूळ होणार होता तो आता रोखला जाईल. ज्या उमेदवारांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा मतदारांना देण्यासाठी घरी आणल्या आहेत, ते उमेदवार चांगलेच हादरले असतील. केंद्र सरकारचा हा निर्णय धक्कादायक असला, तरी स्वागतार्ह आहे.- अॅड. धैर्यशील व्ही. सुतारनिर्णय स्वागतार्हपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहेच. पण हा निर्णय प्रत्यक्षात कसा आणला जाणार याविषयीचे त्यांचे विचार स्पष्ट आहेत. त्यामुळे काळा पैसा हद्दपार करण्याचे त्यांचे प्रयत्न नक्कीच फळास येतील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा मंगळवार रात्री पासून रद्द करण्याची घोषणा करताच त्यांनी कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. साऱ्यांनी या मागील मतितार्थ जाणून घ्यावा आणि काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पाऊल उचलावे.- प्रा. रुबी ओझा, (संचालक - बीसीयुडी, एसएनडीटी महिला विद्यापीठ)चांगल्या कामासाठी त्रास सहन करूपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. हा निर्णय योग्य असून त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. सर्वसामान्य जनतेने आता भ्रष्टाचार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला काही दिवस त्रास सहन करावा लागेल. मात्र हा त्रास चांगल्या कामासाठी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. - समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्तेनियोजनाची गरज हवी होतीयोग्य निर्णय असला तरी सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य जनतेच्या व्यवहारावर काय परिणाम होईल याची प्रथम माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केले पाहिजे होते. ज्यांना एटीएम आणि आॅनलाईन व्यवहार हाताळता येत नाही, अशा ग्राहकांना फटका बसेल. काळा पैसा असणारे बँकेत पैसे जमा करु शकतील. त्यामुळे त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. परंतु सर्वसामान्य यात भरडला जाईल.- सुधीर बदामी, वाहतूक तज्ञ्जही तर सामान्यांची घुसमट या निर्णयामुळे गडगंज श्रीमंतांचा काळा पैसा बाहेर येईल. याबाबत कितपत फायदा होईन हे आता सांगू शकत नाही. मुळात या लोकांना पैसा कसा कुठे फिरवायचा? याबाबत चांगलीच माहिती आहे. मात्र सध्या तरी यामध्ये सामान्य जनता भरडली जाईल.- वाय. सी. पवार, माजी आयपीएस अधिकारीकाळा पैसा बाहेर येईल!या निर्णयाने दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईन. त्यातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असता. ज्यांना याबाबत माहिती आहे. त्यांनी त्यांची व्यवस्था केली असेलच. या नोटा चलनातूनच बाद केल्यामुळे याचा फायदा दिसून येईन. -सुधाकर सुराडकर, माजी आयपीएस अधिकारीअण्णा हजारेंच्या समर्थकांकडून स्वागतअहमदनगर : काळा पैसा रोखण्यासाठी हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी स्वागत केले आहे. अण्णांच्या आंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया त्यांचे निकटवर्तीय अशोक सब्बन यांनी दिली. काळा पैसा रोखण्यासाठी हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची मागणी अण्णा हजारे यांनीही केली होती. यासंदर्भात त्यांनी सरकारशी पत्रव्यवहारही केला होता. मोदींच्या घोषणेनंतर अण्णांचे स्वीय सहायक त्यांना या निर्णयाची माहिती देण्यासाठी गेले होते. मात्र, अण्णा त्यांच्या दिनचर्येप्रमाणे विश्रांती घेत असल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही. अण्णांच्या प्रतिक्रियेबाबत खुद्द त्यांच्या समर्थकांनाही उत्सुकता आहे.धाडसी निर्णयहा एक धाडसी निर्णय आहे. यामुळे काळा पैसा बाहेर येईल. पण यापुढे चलनात येणाऱ्या २०००च्या नोटामध्ये विशिष्ट प्रणाली बसवण्यात येणार असल्यामुळे पैशांवर ट्रॅक ठेवता येणार आहे. इन्कम डिक्लरेशन स्कीममध्ये पैसे जाहीर न झाल्याने हा निर्णय सरकारला घ्यावा लागला, असेच दिसून येत आहे. - डॉ. सुहास पिंगळे, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन ऐतिहासिक निर्णयदेशातील पैशाचा काळा बाजार थांबावा म्हणून घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे सध्या समांतर उभी राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आळा बसले. यातून नक्कीच बदल दिसून येतील.- डॉ. अविनाश सुपे, संचालक, महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयेदूरगामी निर्णय : पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय हा दूरगामी आहे. देशात साठून राहिलेला काळा पैसा यामुळे बाहेर येईल. बाहेरच्या देशात पाहिल्यास इतक्या मोठ्या रकमेच्या नोटा नसतात. त्यामुळे लोकांना जास्त पैसे साठवता येत नाहीत. आपल्याकडे या नोटांमुळे बराच काळा पैसा जमा झालेला आहे. आता तो बाहेर येईल. रुग्णालयात जे लोक दाखल आहेत, त्यांच्या नातेवाईकांना नोटा बदलणे लगेच शक्य नाही. त्यामुळे सरकारने दिलेली मुदत योग्य आहे.- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे जे रुग्णालय स्वीकारण्याच्या सूचना५00 व १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी जरी उसळली असली तरी ग्राहकांकडून या नोटा स्विकारण्याच्या सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. - रवी शिंदे, पेट्रोल डिलर्स असोसिएशन-अध्यक्षकाळ्या पैशाला आळासाठवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याने बँकेत पैसे बदलण्यासाठी परवापासून सुरुवात होईल. हा योग्य निर्णय आहे.- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
सर्व स्तरातून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत
By admin | Published: November 09, 2016 4:55 AM