मुंबई, दि. 24- राइट टू प्रायव्हसीवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केलं आहे. कोर्टाच्या निकालाने फॅसिस्ट शक्तींना चांगलीच चपराक बसली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राइट टू प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक योजनांसाठी आधार कार्डची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.
‘व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. व्यक्तिगत गोपनीयता नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे फॅसिस्ट शक्तींना आणि विचारांना चपराक बसली आहे. नागरिकांवर पाळत ठेवून दडपशाही करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना हा जोरदार धक्का आहे,’ असं ट्विट करत राहुल गांधींनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत भाजपावर टीका केलीये.
याआधीही काँग्रेसने केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या आधार कार्डच्या सक्तीवर टीका केली होती. ‘काँग्रेस सरकारने आधार कार्डचा वापर करताना व्यक्तिगत गोपनीयतेला धक्का लावला नव्हता. आधारच्या संकल्पनेत कोणताही दोष नाही. मात्र भाजाप सरकारकडून चुकीच्या पद्धतीने आधार कार्डची सक्ती केली जात आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसकडून भाजपवर टीका केली होती.
'राइट टू प्रायव्हसी'संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय
राइट टू प्रायव्हसी संदर्भात सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राइट टू प्रायव्हसी हा मुलभूत अधिकार आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.नऊ सदस्यांच्या घटनापीठाने एकमताने व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केलं.सुप्रीम कोर्टातील 9 सदस्यांच्या घटनापीठाने आज व्यक्तिगत गोपनियता मुलभूत अधिकार (Right to privacy) आहे की नाही याबाबत निर्णय दिला आहे .राज्यघटनेतील कलम २१ नुसार व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आधार सक्तीच्या निर्णयावर मोठा परिणाम होईल असं बोललं जातं आहे. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.