वाराणसी - पंतप्रधाननरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे (Kashi Vishwanath Corridor) उद्घाटन केल्यानंतर त्यांची रिव्हर क्रूझवर काही मुख्यमंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठक होणार आहे. तत्पूर्वी काशीतील कालभैरव मंदिरात जाऊन मोदींनी दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर, गंगा मार्गकडे प्रस्थान करुन ललिता घाट येथे गंगा नदीत मोदींनी डुबकी घेतली.
वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. मोदी मोदी आणि हर हर महादेव या घोषणांनी वाराणसीच्या गल्ली बोळात आसमंत दणाणून गेल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या गाडीवर करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
दरम्यान, आज "संध्याकाळी नदीच्या समुद्रपर्यटनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची अनौपचारिक बैठक होईल. वाराणसीचे खासदार असल्याने त्यांनी नदीच्या काठावर वसलेल्या काशीची भव्यता मुख्यमंत्र्यांना दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. रिव्हर क्रूझवरून पंतप्रधान गंगा आरती पाहतील आणि घाटांवर भव्य उत्सवाचा आनंद लुटतील. फटाक्यांची आतषबाजी आणि लेझर शोही होणार आहे.