नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे २१ तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले ओबामा तिन्ही सैन्य दलांच्या गार्ड आॅफ आॅनर सन्मानाने पहिल्याच दिवशी भारावून गेले. ‘हा माझा मोठा सन्मान आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ओबामा हे दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणारेही ते पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष.सकाळी १० वाजेदरम्यान फर्स्ट लेडी मिशेल यांच्यासोबत सैन्य दलाच्या पालम विमानतळावर दाखल झालेल्या ओबामा दाम्पत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व औपचारिकता बाजूला ठेवून स्वागत केले. मोदी यांनी ओबामांना ‘जादूची झप्पी’ देत गळाभेट घेतली. यानंतर त्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेल्या राजधानीतील हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये ते पोहोचले. तेथून दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ओबामा राष्ट्रपती भवनाच्या परिसरात प्रवेश करताच घोडदळातील पथक त्यांच्या गाडीच्या दुतर्फा मार्गक्रमण करू लागले आणि याच वेळी २१ तोफांच्या सलामीने त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांचे औपचारिक स्वागत केले. या वेळी प्रारंभी अमेरिकेचे राष्ट्रगीत व नंतर भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. राष्ट्रपती भवनातील भारतीयत्वाचे दर्शन घडवणाऱ्या या आगळ्यावेगळ्या स्वागत समारंभाने ओबामा भारावून गेले. ‘हा माझा मोठा सन्मान असून, या विशेष आदरातिथ्याने मी भारावून गेलो आहे,’ अशा शब्दांत ओबामांनी तिन्ही सैन्य दलांकडून गार्ड आॅफ आॅनर स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान मोदी यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ‘नमस्ते’ केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्वागत, सन्मानाने ओबामा भारावले!
By admin | Published: January 26, 2015 4:43 AM