ऑनलाइन लोकमत
खडगपूर, दि. ३ - कठोर मेहनत, महत्वाकांक्षा आणि जिद्द असेल तर माणूस यशाच्या शिखरावर नक्की पोहोचतोच, मार्गात आलेला कोणताही अडथळा पार करून तो आपले लक्ष्य साध्य करतोच.. हे म्हणणे बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील संहौली गावातील एका वेल्डरच्या मुलाने सार्थ केल्या आहेत. सरकारी शाळेतून शिक्षण घेणा-या वात्सल्य चौहानला मायक्रोसॉफ्ट कंपनीने नोकरी ऑफर करत तब्बल १.२ कोटी रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. आयआयटी खडगपूरमध्ये बी.टेकच्या फायनल इयरमध्ये शिकणा-या वात्सल्यने कठोर मेहनतीने हे यश मिळवले असून त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. जून महिन्यात बी.टेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू होणार असल्याचे वात्सल्यने सांगितले.
सहा भावा-बहिणींमध्ये सर्वात मोठा असणा-या वात्सल्यचे वडील उदरनिर्वाहासाठी वेल्डिंगची कामं करतात. वात्सल्यने सरकारी शाळेच्या हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले असून कोटा येथील एका कोचिंग क्लासचाही त्याच्या शिक्षणात व यशात महत्वपूर्ण वाटा आहे. १२ वीत ७५ टक्के मिळवल्यानंतर वात्सल्य २०११ साली आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अॅलन करिअर कोचिंग सेंटरमध्ये दाखल झाला कठोर मेहनत करत आयआयटी-जी प्रवेश परीक्षेत देशात त्याचा ३८२ वा क्रमांक आला आणि त्याने आयआयटी-खडगपूरमध्ये काँप्युटर सायन्ससाठी सहज प्रवेश घेतला. सध्या तो बी टेकच्या अखेरच्या वर्षाला शिकत आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटदरम्यान वात्सल्यची हुशारी पाहून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अधिकारी प्रभावित झाले. आणि त्यांनी वात्सल्यची निवड करत त्याला वार्षिक १.०२ कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर केले.