नवी दिल्ली - शत्रूने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणा-या अॅडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. या तंत्रज्ञानामुळे शत्रूने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र टार्गेटवर पोहोचण्याआधीच हवेतच नष्ट करता येऊ शकते. ओदिशा येथील तळावर ही चाचणी घेण्यात आली. डीआरडीओने विकसित केलेल्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची या वर्षातील ही तिसरी चाचणी होती.
बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा मार्ग गोळीनेच रोखणे अशा प्रकारची ही चाचणी आहे. गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता ओदिशाच्या बालासोर समुद्र किना-याजवळच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे.
आजच्या चाचणीमध्ये इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने टार्गेटच्या दिशेने येणा-या पृथ्वी क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेतला. हे मोठे यश असल्याचं संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले आहे. याआधी 1 मार्च आणि 11 फेब्रुवारीला इंटरसेप्टरच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची उड्डाणवस्थेतील निकष तपासण्यासाठी घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी ठरली असे सूत्रांनी सांगितले.
इंटरसेप्टर वैशिष्टय इंटरसेप्टरचे वैशिष्टय म्हणजे या क्षेपणास्त्रात स्वत:ची रडार यंत्रणा आहे. मानवी आदेशांशिवाय हे क्षेपणास्त्र स्वत:च शत्रू क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग ओळखून ते नष्ट करते. जगातील मोजक्या देशांकडे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान असून त्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
संपूर्णपणे बहुस्तरीत बॅलिस्टिक मिसाईल सुरक्षा प्रणाली प्राप्त करण्याच्या प्रयत्नांतर्गत भारताने मागच्यावर्षीही या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. या इंटरसेप्टरसाठी पृथ्वी क्षेपणास्राच्या नौदल आवृत्तीला लक्ष्य म्हणून समोर ठेवण्यात आले होते. बंगालच्या उपसागरात उभ्या असलेल्या युद्ध नौकेवरून हे क्षेपणास्र डागण्यात आले.
लक्ष्यरूपी क्षेपणास्र सकाळी ११.१५ वाजता डागण्यात आले आणि इंटरसेप्टर ‘अॅडव्हॉन्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटावर तैनात करण्यात आले होते. त्याला रडारवरून संकेत मिळत होते. या इंटरसेप्टरने लक्ष्यरूपी क्षेपणास्राला आकाशातच नष्ट केले.