ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. ७ - एखादी व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे आपण अनेकवेळा ऐकतो, पण तलावात पडून मगरींच्या तावडीत सापडूनही जिवंत परतलेला एक तरूण पाहून गुजरातमधील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव आला. मानसिक संतुलन बिघडलेला मुकेशने ( वय २५) मंगळवारी आत्महत्या करण्यासाठी विश्वामित्री नदीत उडी मारली खरी, मात्र तेथे तो अर्धा डझन मगरींच्या तावडीत सापडला.
सात ते आठ मगरींच्या गराड्यात अडकलेला मुकेश मदतीसाठी ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून जवळच काम करणा-या काही नागरिकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना नदीत पडलेला मुकेश दिसला, काही मगरींनी त्याला जबड्यात पकडले होते, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र सुदैवाने मगरींनी त्याला ओढून पाण्याखाली न नेल्याने त्याचा जीव वाचला. मगरींचे लक्ष हटवण्यासाठी लोकांनी आरडाओरड सुरू केली व काही जण त्यांना दगडही मारू लागले. जवळपास १५ मिनिटांच्या संघर्षानंतर नागरिकांना मुकेशला वाचवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नदीकाठी धाव घेतली आणि त्यांनी मुकेशची मगरींच्या तावडीतून सुटका केली. या घटनेत मुकेशचा जीव वाचला असला तरी मगरींनी जबड्यात पकडल्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा झाल्या, तसेच शरीरातून भरपूर रक्तस्त्रावही झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.