फरिदाबाद - गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
२३ ऑगस्टच्या रात्री आरोपींनी विद्यार्थी आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र शांकी आणि हर्षित यांना गो तस्कर समजले आणि दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग केला. जेव्हा आर्यनला कार थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने कारचा वेग वाढवला, त्यानंतर आरोपींनी टोलनाक्यावर त्यांच्यावर गोळीबार केला. यात आर्यनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार आणि अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवेआर्यन मिश्रा रात्री ११ वाजता मित्र शांकी आणि हर्षित, त्यांची आई श्वेता गुलाटी आणि दोन महिलांसोबत वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी गेले होते. मात्र, नूडल्स खाऊन परतत असताना गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवे होते. ते पाहून आर्यन घाबरला आणि त्याने कारचा वेग वाढविला. यावेळी गोरक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला. कार थांबल्यावर आर्यनवर पुन्हा एकदा आरोपींनी गोळी झाडली. मात्र, गाडीतील महिलांना पाहून आपण चुकीच्या लोकांच्या मागे लागल्याचे गोरक्षकांना वाटल्याने त्यांनी पळ काढला.
काँग्रेसची टीका- हरयाणातील भाजप सरकारचे १० वर्षांचे हे रिपोर्ट कार्ड आहे. येथे दिवसाढवळ्या रस्त्यावर लोकांची हत्या केली जात आहे.-येथे गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत. त्यांच्या मनात कायद्याची भीतीन नाही.-भाजपच्या डबल इंजिन सरकारने हरयाणाला ‘क्राइम कॅपिटल’ बनवून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
वडील म्हणाले, त्यांना अधिकार कुणी दिला? - माझ्या मुलाला गो तस्कर समजून गोळ्या घालण्यात आल्या. गाय तस्करीच्या संशयावरून एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार या गोरक्षकांना कुणी दिला आहे?- तो अधिकार दिला असेल तर का दिला आहे? आम्ही पंडित आहोत. कोणाशीही वाद नव्हता, असे आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले.