Ratan Tata : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पोहोचली आहे. त्यांच्या निधनाने भारतातील शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकही दु:ख व्यक्त करत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समुह शिखरावर नेऊन ठेवला आहे. टाटा समुहात नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण धडपड करत असतात. सरकारी नोकरीनंतर टाटा समुहातील नोकरीला वेगळ्या पद्धतीच महत्व आहे, हे महत्व रतन टाटा यांनी मिळवून दिलं आहे.
टाटा समुहात नोकरीत मिळणं म्हणजे एकप्रकारे सेटल झालो असंच तरुण त्याकाळात समजायचे. एकतर सरकारी नोकरी सरकारी नसेल तर टाटा समुहात नोकरी हेच तरुणांचं स्वप्न असायचं. देशातील तरुणींमध्ये टाटा समुहाने एवढा विश्वास दिला होता. त्याचं कारण म्हणजे रतन टाटा.
रतन टाटा यांनी ज्या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, त्या कंपन्या आज यशाच्या शिखरावर आहे. रतन टाटा यांनी टाटा समुहाच्या जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कामगारांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या गरजा याचा अभ्यास केला होता. यानंतर रतन टाटा यांच्यावर टाटा समुहाची जबाबदारी आली. यावेळी त्यांनी कामगारांसाठी अनेक नव्या सुविधा सुरू केल्या, यातल्या काही सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळत नव्हत्या.
रतन टाटा यांचे समुहाची कर्मचाऱ्यांवर लक्ष असायचे. रतन टाटा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापासून त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांकडे विशेष लक्ष देत असत. टाटा समूह आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आणि आजारपणात उपचारासाठी हॉस्पिटलची व्यवस्था करतात.
हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
वर्ष २०२१ चं होतं. उद्योगपती रतन टाटा यांना आपला एक माजी कर्मचारी जास्त आजारी असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच रतन टाटा यांनी थेट पुणे गाठलं आणि त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. या एका किस्स्यावरुन आपल्या लक्षात आलं असेल टाटा समुह असाच एवढा मोठा झाला नसेल. रतन टाटा ज्यावेळी ८३ वयाच्या होते त्यावेळी त्यांनी पुण्यात येऊन त्यांच्या कर्मचाऱ्याची भेट घेतली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांना किती मदत केली असेल याची कल्पना करा.
पुण्यात अचानक दिलेल्या भेटीचा उद्योगपती रतन टाटा यांचा फोटो एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यावेळी जगभरात त्यांचं कौतुक झालं.