रांची - विहिरीत पडलेल्या एका बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. झारखंडच्या रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या पिस्का गावात ही घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले लोकं एकाच गावातील होते, त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत होता. त्यामुळे, विहिरीतील माती ढासळत होती.
विहिरीजवळ असलेला बैल गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विहिरीत पडला. याबाबत माहिती मिळताच गावातील ९ लोक बैलाला बाहेर काढण्यासाठी विहिरीजवळ आले, काही विहिरीतही उतरले. बैलाला रस्सीने बांधून ते वरी काढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, विहिरीची ढासळत असलेली माती मोठ्या प्रमाणात ढासळली आणि विहीरच खचली. त्यामुळे, या विहिरीवर उभारलेला सर्वजण विहिरीच्या मातीखाली गाडले गेले. त्यामुळे, तात्काळ स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात माहिती देण्यात आली.
एनडीआरएफच्या पथकाने आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. सर्वांच्या मदतीने ३ जणांना जिवंतपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला.
विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विक्रांतच्या डोक्याला जखम झाली आहे. दरम्यान, माझे वडील शेतात काम करत होते. त्यावेळी माझा लहान भाऊ त्यांच्याकडे आला होता. एक बैल विहिरीत पडल्याचे त्याने वडिलांनी सांगितले. त्यामुळे, वडील विहिरीकडे मदतीसाठी धावले. मीही त्यांच्यामागे गेलो. त्यावेळी तिथे ही दुर्घटना घडली. जवानांनी अनेक तासांनंतर मला बाहेर काढलं. पण, दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाल्याची आपबिती विक्रांत यांनी सांगितली.