पुणे : संरक्षण मंत्रालयाने खासगी कंपन्यांकडून संरक्षण उत्पादनाच्या निविदा मागविल्या आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करत देशातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या कर्मचारी संघटनांकडून चार आॅगस्ट रोजी ‘धरणे आंदोलन’ केले जाणार आहे.एकीकडे देशातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या चर्चा करत असल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे खासगी कंपन्यांकडून निविदा मागवायच्या, असे दुटप्पी धोरण देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून अवलंबले जात आहे, असा आरोप करत दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या कर्मचारी संघटनांनी संरक्षण मंत्रालयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.देशातील आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन करण्यासाठी सरकारने घोषणा केली होती. याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून खासगी मॅनेजमेंट कन्सल्टन्सिकडून निविदा मागवल्या होत्या. या निविदा मागवणे ही संरक्षण क्षेत्रातील कामगारांची घोर फसवणूक असून, याविरोधात संपावर जाण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली होती. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाच्या या भूमिकेविरोधात आवाज उठविण्यासाठी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, आॅल इंडिया डिफेन्स इम्प्लॉयी फेडरेशन आणि इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन या तीन संघटनांकडून ४ आॅगस्ट रोजी देशभरातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या आवारात धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनेचे पुण्यातील अध्यक्ष संजय मेनकुदळे यांनी दिली आहे.
आयुध निर्माण कारखान्यांचे कर्मचारी जाणार संपावर; ४ ऑगस्टपासून देशव्यापी धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:17 PM
संरक्षण मंत्रालयाने खासगी कंपन्यांकडून संरक्षण उत्पादनाच्या निविदा मागवल्याने नाराजी.
ठळक मुद्देकॉर्पोरेटायझेशनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची फसवणूक