नवी दिल्ली - देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढत चालली आहे. परंतु संसदेत यावर चर्चा होऊ दिली जात नाही. देशात ७० वर्षात निर्माण झालेली लोकशाही गेल्या ८ वर्षात संपवली आहे. लोकांसमोर जे सत्य आहे ते उघड व्हायला हवं. मी जेवढे सत्य लोकांसमोर आणेन तेवढं माझ्यावर हल्ला केला जाईल. लोकांचा मुद्दा उचलण्याचं काम मी करत राहणार आहे. जो धमकावतो तोच घाबरलेला असतो. आजच्या देशाच्या परिस्थितीला पाहून ते घाबरतात. जनतेच्या शक्तीला घाबरतात. २४ तास हे खोटे सांगतात अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी जितकं जनतेचे मुद्दे उचलणार, महागाई, बेरोजगारी यावर बोलणार तितके माझ्यावर आक्रमण केले जाणार आहे. माझ्यावर जितके आक्रमण होईल तितकाच जास्त मला फायदा होणार आहे. मी आक्रमणांना घाबरणार नाही. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. जी लोकशाही ७० वर्षात आम्ही बनवली ती ८ वर्षात संपवली आहे. देशात आजच्या घडीला लोकशाही नाही. केवळ ४ लोकांची हुकुमशाही आहे. जनतेच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यावर आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते असा आरोप राहुल गांधींनी केला.
काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई वेगाने सुरूवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ईडीच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. संसदेची कारवाई सुरू असताना सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी केली जात आहे असा आरोप गहलोत यांनी केला आहे.
काँग्रेसकडून आज महागाईच्या मुद्द्यावर संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या भेटीची वेळही मागितली आहे. परंतु अद्याप भेटीची वेळ निश्चित नाही. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता इतर परिसरात कलम १४४ लागू केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. जर १४४ कलमाचं उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व वीवीआयपींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.