वर्धमान - पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्हातील समुद्रगडमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमान जिल्हातील समुद्रगड परिसरात राहणा-या एका युवकाने येथील महिलांचे फोटो मॉर्फ करुन सोशल मीडियात शेअर केले. यानंतर फोटो शेअर करणा-या त्या युवकाला लोकांनी पकडून बदडले आणि माफी मागायला लावली. या घटनेनंतर माफी मागणा-या युवकाने पुन्हा आपल्या काही लोकांसह मारहाण करणा-या लोकांवर हल्ला चढवला. यावेळी दोन्ही गटात मोठी हाणामारी झाली. यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, याप्रकरणी 18 जणांना अटक केली आहे.