कोलकाता: जमात-उल-मुजाहिद्दिनच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलानं (एसटीएफ) ही कारवाई केली आहे. तिन्ही दहशतवादी दक्षिण कोलकात्यात वास्तव्यास होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांच्या एसटीएफनं शनिवारी रात्री संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची माहिती थोड्याच वेळापूर्वी एसटीएफकडून देण्यात आली.
शनिवारी रात्री हरिदेवपूर परिसरातून एसटीएफनं तिन्ही संशयितांना अटक केली. तिघेही बांगलादेशचे नागरिक आहेत. त्यांचं कनेक्शन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नाजी-उर-रहेमान, शेख शब्बीर आणि रिजाऊल अशी संशयितांची नावं आहेत. हे तिघे बऱ्याच कालावधीपासून कोलकात्यात मुक्काम करून होते. त्यांच्याकडून घातपाताचा कट आखला जात होता. मात्र योग्य वेळी गुप्त सूचना मिळाल्यानं हा कट उधळला गेला. एसटीएफनं वेळीच कारवाई केल्यानं अनर्थ टळला.
दक्षिण कोलकात्यातील हरिदेवपूरमधील एका घरात तिन्ही संशयित दहशतवादी भाड्यानं राहात होते. घातपाताच्या कारवाया करण्यासाठी ते कट रचत होते. दहशतवादी संघटनांचा विस्तार करण्यासाठीदेखील त्यांच्या हालचाली सुरू होत्या. याबद्दलची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एसटीएफनं सूत्रं हाती घेत कारवाई केली. अटक करण्यात आलेले तिघे जमात-उल-मुजाहिद्दिनचे सक्रीय सदस्य असल्याची माहिती एसटीएफचे सहआयुक्त व्ही. सोलोमन नेसा कुमार यांनी दिली. त्यांच्याकडून मोबाईल, डायरी आणि अन्य कागदपत्रं जप्त केली आहेत. त्यांचा संबंध आयएसआयशी आहे. दहशतवादी नेत्यांशी त्यांचा संपर्क होता का, याचा तपास एसटीएफकडून करण्यात येत आहे.