ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २५ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ४९ जागांसाठी सोमवारी ७८.०५ टक्के मतदान झाल्याची माहिती निडणूक आयोगाने दिली आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली खरी मात्र ब-याच ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील बिघाडामुळे मतदान सुरू होण्यास विलंबही झाला.
मतदान सुरु झाल्यानंतर ११ वाजेपर्यंत ४५ टक्के झाले. त्यानंतर मतदारांची संख्या वाढल्याची विविध मतदान केंद्रांवर दिसून येत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ६७ टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर दिवसअखेर ७८.०५ टक्के मतदान झाल्याची माहिती निडणूक आयोगाने दिली.
दरम्यान, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार व हिंसाचार घडू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौथ्या टप्प्यातील या मतदानात अमित मित्रा, पुर्णेन्दु बासू, चंद्रिमा भट्टाचार्य, ब्रत्य बासू, ज्योतिप्रिय मलिक आणि अरूप राय यांच्यासारख्या तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या तसेच भाजपाच्या रूपा गांगुली, माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला, काँग्रेस नेते अरूणावा घोष यांचे भवितव्य बंद मतदान पेटीत बंदीस्त झाले आहे.