नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२९ विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. ममता यांनी यावर अंकुश लागावे म्हणून, पक्षांतील दगाबाज नेत्यांचा शोध सुरू केला आहे.
सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे.
ममता यांनी तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांना आदेश दिले की, अशा नेत्यांना शोधून काढा ज्यांनी सीपीएमची आणि तृणमूलची काही मते भाजपला वळविण्यास मदत केली. टीएमसीच्या अंतर्गत सर्व्हेत समोर आले की, त्यांना जंगलमहल आणि उत्तर बंगालमधील गरीब लोकांची मते मिळाली नाही. या भागात आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत.
टीएमसीच्या एका नेत्याने सांगितले की, टीएमसी शहरी आणि निम्म शहरी भागातील आपला मतदार कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. परंतु, सातवे वेतन आयोग राज्यात लागू करण्यात आले नसल्याने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची ७० लाख मते टीएमसीला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेतील धक्क्यानंतर आता ममता बॅनर्जी पक्ष संघटनेवर अधिक भर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज्यातील विकास कामांचा मुद्दा निवडणुकीत दिसला नाही. आमचे सर्व मतदार अचानक देशभक्त झाल्याचा सूर तृणमूलच्या बैठकीत होता. तसेच अनेक नेते स्थानिक आमदारांच्या साथीने पक्षाच्या नावावर लोकांकडून पैसे घेतात, अशा नेत्यांचा शोध घेण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.