कोलकाता : पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मंगळवारी लोकसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचार झाला. या जागेवर भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल निवडणूक लढवत आहेत. अग्निमित्रा पॉल यांनी आपल्या ताफ्यावर टीएमसी समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा ताफा एका मार्गावरून जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने लोक ताफा अडवण्याचा प्रयत्न करत असून गाड्यांवर हल्ला करत आहेत. यावेळी त्यांच्या हातात बांबूच्या काठ्या दिसून येत आहेत. यावर अग्निमित्र पॉल यांनी टीएमसीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. मात्र, पोलिसांनी काहीही केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
टीएमसी समर्थकांनी माझ्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांवर बांबूच्या काठीने हल्ला केला. ममता बॅनर्जी काहीही करा, विजय भाजपचाच होईल, असे अग्निमित्रा पॉल यांनी सांगितले. तसेच, त्या म्हणाल्या की,"मला लाज वाटते की एका महिला आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नादिया अल्पवयीन बलात्कार आणि हत्या प्रकरणावर लाजिरवाणी टिप्पणी केली की, बलात्कार पीडितेचे प्रेमसंबंध होते की ती गर्भवती होती? हे पाहावे लागेल."
दोन जागांवर पोटनिवडणूकपश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजता कडक बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. आसनसोलमधील 2,012 मतदान केंद्रांपैकी एकूण 680 आणि बालीगंजमधील सर्व 300 मतदान केंद्रे 'संवेदनशील' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आसनसोलमध्ये जवळपास 15 लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. बालीगंजमध्ये सुमारे अडीच कोटी मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघात केंद्रीय दलाच्या एकूण 133 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यापैकी 70 बालीगंज आणि उर्वरित आसनसोलमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बाबुल सुप्रियो यांनी भाजपमधून टीएमसीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा दिला, तर बालीगंजचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या कारणांमुळे या दोन्ही जागांवर मतदान होत आहे.