कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड खेळले असून, आपण ब्राह्मणाची मुलगी असल्याचे सांगितले. तर, काल झालेल्या एका सभेत बोलताना आपले गोत्र शांडिल्य असल्याचे म्हटले. यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, अशी विचारणा केली आहे. (asaduddin owaisi replied mamata banerjee)
अलीकडेच झालेल्या एका प्रचारसभेत मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी आहे. मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांनतर माझे गोत्र शांडिल्य असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. एक ट्विट करत ओवेसी यांनी ममता दीदींवर निशाणा साधला आहे.
आमच्यासारख्यांनी नेमकं काय करायचं
आमच्यासारख्या लोकांना काय करायचं. आमचं गोत्र शांडिल्य नाही, जानवं घालत नाही, अमूक एका देवाचे भक्तही नाही, चालीसा पठण करत नाही की, त्या मार्गावर जात नाही. जिंकण्यासाठी हिंदू कार्ड वापरायला हवे, असे प्रत्येक पक्षाला वाटते. हे अनैतिक, अपमानजनक आणि अयशस्वी होणारे आहे, असे ट्विट असदुद्दीने ओवेसी यांनी केले आहे.
“नरेंद्र मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, केव्हाही टीव्ही ऑन करा आणि बघा”
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?
नंदीग्राम येथील एका जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी एक आठवणीतील किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, एका मंदिरात पूजनासाठी गेले होते. तेव्हा मला माझे गोत्र विचारण्यात आले. मागे एकदा त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझे गोत्र मां, माटी आणि मनुष्य असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मला विचारल्यावर मी सांगितले की, माझे वैयक्तिक गोत्र शांडिल्य आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून भाजपविरोधात पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.