कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी एका सभेला संबोधित करताना भाजपवर पलटवार केला आहे. जगात भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असल्याचा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world)
ममता बॅनर्जी यांनी हल्दिया येथील रॅलीला संबोधित केले. भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असून, नोटबंदीपासून ते बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना केवळ लुटण्याचे काम भाजपने केले, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका
बंगालींना दंगामुक्त राज्य हवेय
पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये. दंगलीचे षडयंत्र रचणे, हत्या करणे, दलित महिलांचे शोषण करणे अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नाव वारंवार येत असते. बंगाली नागरिकांना दंगामुक्त राज्य हवे आहे. बंगालमध्ये शांतता नांदावी, असे वाटत असल्यास भाजपला मत देऊ नका, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तसेच नोटबंदी, पीएम केअर फंड यांबाबत पारदर्शकता आणून काही गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
शुभेंदू अधिकारींवर टीकास्त्र
काही बंडखोरांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता मला बरे वाटत आहे. आम्ही वाचलो, असा टोला ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता लगावला. बंगालमध्ये विकास झाला नाही, अशी टीका भाजपवाले करत आहेत. मग दिल्लीत तुम्ही काय केले, असा प्रतिप्रश्न ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून आठ टप्प्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ५० ते ५५ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते, सुमारे तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथील सभेला संबोधित करताना केली होती. त्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला आहे.