कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यातच आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोना अधिक प्रमाणावर फैलावला, असा दावा ममता दीदींना केला आहे. (mamata banerjee criticised bjp over corona situation)
नौपाडा येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी सदर टीका केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत निशाणा साधला.
निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ
बाहेरून आलेल्यांच्या चाचण्या नाही
पाच महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात होता. मात्र, भाजपने बाहेरून लोकांना आणले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. इतकेच नव्हे, तर त्या लोकांची कोरोना चाचणीही करण्यात आलेली नाही. लोकं बाहेरून येऊन कोरोना पसरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅली, प्रचारसभा यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे होणारे पालन यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ
पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गरज असेल, तेथे कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी कलम १४४ लागू करावे, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगावर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.