भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:35 PM2021-03-16T20:35:33+5:302021-03-16T20:37:28+5:30
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, विविध ठिकाणच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे पायाला फ्रॅक्चर झाले असतानाही, ममता दीदी मागे हटताना दिसत नाहीएत. अशातच भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee slams bjp over various issues)
ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रॅलीत जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना छळण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा हल्लाबोल ममत बॅनर्जी यांनी केला.
भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी
भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय
भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय. निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतोय. माझे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना हटवण्यात आले. नंदीग्राम येथील घटनेला भाजप जबाबदार आहे, असा आरोप करत, भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
पैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय
भाजपच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. यामुळे अमित शहांचा तिळपापड होतोय. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला.
ममता बॅनर्जींना रोखणे कठीण
डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही मी बसून राहिले नाही. कारण मी आराम केला, तर भाजप जनतेला जे दुःख देईल, ते सहन करण्यापलीकडील असेल. ममता बॅनर्जी यांना रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी चक्रीवादळ, कोरोना संकटात पश्चिम बंगालची योग्य पद्धतीने मदत केली नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.