PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागी होणार? विजयवर्गीय म्हणाले, माझे बोलणे झाले आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:28 PM2021-03-06T18:28:35+5:302021-03-06T18:32:26+5:30
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांनी मोर्चे बांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत.
कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांनी मोर्चे बांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. भाजपनेही प्रचारासाठी कंबर कसली असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत. या रॅलीत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याचा कयास बांधला जात आहे. यासंदर्भात भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलास विजयवर्गीय यांना विचारले असता, माझे आणि त्यांचे बोलणे झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (west bengal assembly election 2021 mithun chakraborty to be join pm modi rally)
लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कैलास विजयवर्गीय पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आहेत. कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होणार आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले.
शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार
माझे आणि त्यांचे बोलणे झाले आहे
मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कैलास विजयवर्गीय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनता याच सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सार्वजनिकरित्या येणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करू. मिथुनदा आणि माझी फोनवर चर्चा झाली आहे. कोलकाता येथे येऊन पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले. मिथुन चक्रवर्ती तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार होते.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होतील, असे म्हटले जात आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला सौरव गांगुली आणि भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.