West Bengal Election 2021: ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:02 PM2021-03-25T13:02:58+5:302021-03-25T13:04:32+5:30
west bengal assembly election 2021: काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारत शरद पवार तीन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. यातच आता बंगालच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारत शरद पवार तीन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेससाठी प्रचार केल्यास ममता बॅनर्जी यांना फायदा मिळू शकतो. तर काँग्रेस पक्षासाठी हा धक्का ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (west bengal assembly election 2021 ncp leader sharad pawar three days visit west bengal and will meet mamata banerjee)
शरद पवार १ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांचा हा तीन दिवसीय दौरा असणार असून, ते यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. तसेच ममता ममता बॅनर्जी यांच्या काही रॅली, पत्रकार परिषदांना संबोधित करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी
ममता दीदी आणि शरद पवारांची भेट
ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचार यंत्रणेचा सामना ममता बॅनर्जी यांना करावा लागत आहे. त्यासाठीच शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. शरद पवार तीन दिवस बंगालमध्ये फिरून प्रचार करतील. तसेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे तपासे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.
काँग्रेचा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या कार्यक्रमावरून काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट होत आहे.
साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली
प्रचाराला भाजप नेत्यांची फौज
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसात अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ अशा भाजपच्या बड्या नेत्यांसह मिथुन चक्रवर्ती, गौतम गंभीर हेदेखील प्रचारसभांमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. ०२ मे रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अधिक चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे.