West Bengal Election 2021: भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:56 PM2021-04-10T16:56:55+5:302021-04-10T16:58:46+5:30
West Bengal Election 2021: कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
सिलीगुडी: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असताना पुन्हा एकदा पुढील टप्प्यासाठी प्रचारसभांना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, सिलीगुडी येथे त्यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावर नाराजी आणि दुःख व्यक्त करत भाजपचा होत असलेला मोठा विजय ममता दीदींना पाहावत नाही. त्यांच्यावर आता कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. (pm narendra modi slams mamata banerjee over coochbehar violence)
कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. कुचबिहार येथे झालेला हिंसाचार दुःखद असून, यामुळे ममता दीदींचा निवडणुकीत विजय होईल, असे नाही. भाजपचा विजय आता ममता बॅनर्जी यांनाही दिसू लागला आहे. मात्र, हिंसाचारामुळे त्या सत्ता राखण्यात यशस्वी होणार नाहीत. त्यांचे स्वतःवरील आणि पक्षावरील नियंत्रण सुटत चालले आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.
तृणमूलची मनमानी आता चालणार नाही
सत्ता जात असल्याची जाणीव ममता बॅनर्जींना झाली आहे. तृणमूल काँग्रेसची मनमानी आता चालणार नाही. कुचबिहार हिंसाचाराप्रकरणी जबाबदार असलेल्या दोषींवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण बदलण्याची वेळ आली आहे. बंगालमधील नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण, अत्याचार, अन्याय दूर करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ममता दीदींनी रिपोर्ट कार्ड द्यावे
गेल्या १० वर्षांत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी काय केले, याचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, असे सांगत आता भाजपचे सरकार येण्याचे मन जनतेने बनवले आहे. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिनच्या माध्यमातून बंगाली जनतेला विकास, राज्याचा विकास यांवर अधिकाधिक भर देण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.