कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 tmc leader abhishek banerjee slams bjp)
"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गळा कापला, तरी जय हिंद, जय बांगला, जय मेदिनीपूर, ममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार. मला घाबरवण्याचा सुरू असलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
मेदिनीपूर हा शुभेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. शुभेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सर्वांत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ता मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यानंतर गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मी कोणालाही घाबरत नाही
सीबीआय आणि ईडी यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर करत मला भीती घालू शकत नाही. शुभेंदू अधिकारी यांना घाबरवले गेले असले, तरी मी कोणालाही घाबरत नाही. भाजप करत असलेला अन्याय आणि पसरवत असलेल्या द्वेषाविरोधात मी नेहमीच बोलत राहणार. काही लोकांनी तपास यंत्रणांना घाबरून पक्षबदल केला. मात्र, ही तसे करणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.