कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. या टप्प्यात ३० जागांचा समावेश असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण १९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २१ महिलादेखील आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकात या ३० जागांपैकी २७ ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या ६५९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
क्रांतिकारी गाण्याची धूम; भाजपविरोधात एकवटले कलाकार
- एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने काही अभिनेत्यांना रिंगणात उतरवले असताना दुसरीकडे भाजपच्या अजेंड्याविरोधात एका गाण्याने धूम केली आहे. बंगालमधील विविध कलाकार या गाण्याच्या माध्यमातून भाजपविरोधात एकत्र आले आहे.
- ‘आम्ही ओन्यो कोठाओ जाबोना...’ म्हणजेच आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही याच देशाचे आहोत, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. भाजपच्या ‘सीएए’च्या भूमिकेला आव्हान देण्यात आले.
- बंगालमधील अभिनेते अनिर्बान भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या गाण्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून ‘सोशल मीडिया’वर तो खूप ‘व्हायरल’ झाला आहे. बुधवारी एका ‘फेसबुक पेज’वर हा ‘व्हिडिओ’ पोस्ट करण्यात आला.
- यात रुद्रप्रसाद चक्रवर्ती, अनिन्द्य मुखोपाध्याय, सुमन मुखोपाध्याय, कौशिक सेन, अनुपम रॉय, रुपंकर बागची यांच्यासह २० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, गायक यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ : या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारचे मागील सहा वर्षातील रिपोर्ट कार्ड मांडण्यात आल्याचे दिग्दर्शिका व अभिनेत्री रिद्धी सेन यांनी सांगितले. यात सहा वर्षातील वादग्रस्त मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. तुकडे तुकडे गँग, अँटी नॅशनल्स, गो टू पाकिस्तान, महिला सुरक्षा यासारख्या मुद्यांनादेखील यातून स्पर्श करण्यात आला आहे. सोबत ‘सीएए’विरोधातदेखील अप्रत्यक्षपणे भूमिका मांडण्यात आली आहे.