कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यासाठीचे मतदान आज सुरू आहे. हे मतदान सुरू असतानाच एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बंगालमधील एका मतदारसंघात महिला मतदारांची छेड काढल्याप्रकरणी भाजपाच्या एका उमेदवाराच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे. (BJP candidate's representative arrested for molesting women during polling)
हा प्रकार पश्चिम बंगालमधील रासबिहारी विधानसभा मतदारसंघात घडला आहे. येथील भाजपा उमेदवार लेफ्टिनंट सुब्रत साहा यांच्या प्रतिनिधीला शहरातील न्यू अलिपूर परिसरातील एका मतदान केंद्रात काही महिलांची छेड काढल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. या प्रकारची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मोहन राव या पोलीस अधिकाऱ्यावर अनेक महिलांनी हात धरल्याचा तसेच ओढत मतदान केंद्रात नेल्याचा आरोप केला आहे. या घटनेबाबत आम्हाला तक्रार मिळाली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे
दरम्यान, राव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले. तर भाजपा उमेदवार साहा म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते परिसरात तणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शांततापूर्ण मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात आज सातव्या टप्प्यामध्ये ३४ जागांवर मतदान होत आहे.