West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:26 AM2021-04-10T06:26:32+5:302021-04-10T07:24:02+5:30
गृहमंत्री शहा यांचेदेखील टीकास्त्र
कोलकाता : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाविरोधात केलेल्या आरोपांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. ममता यांच्या निराधार, तथ्यहीन वक्तव्यांमुळे केंद्रीय सुरक्षा दलाचे मनोबल घटले आहे. हा जवानांचाच अपमान करण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका आयोगाने मांडली आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी आपण आरोपांवर कायम असल्याचे म्हटले असून, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान लोकांना मतदान केंद्रापासून जाण्यापासून थांबवत आहेत. शिवाय महिलांशी असभ्य वागणूक करीत असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भाजपला मदत करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. आयोगाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. यासंदर्भात त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून, शनिवार ११ वाजेपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. असे वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांचे उल्लंघन केले आहे. बॅनर्जी यांनी केंद्रीय दलाच्या जवानांवर आरोप करताना महिला मतदारांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे, हे दुर्दैवी आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची ही दुसरी नोटीस आहे.
केंद्रीय सुरक्षा दलांवर ममतांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री शहा यांनीदेखील भाष्य केले आहे. निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याने ममता निराश झाल्या आहेत. ममता बंगालमध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सुरक्षायंत्रणा आयोगाच्या निर्देशानुसार काम करतात याची जाणीव असायला हवी, असे शहा म्हणाले.
...तोपर्यंत हस्तक्षेपाबाबत बोलत राहील
निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी परत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत भाजपसाठी काम करणे बंद करीत नाही तोपर्यंत सीआरपीएफच्या हस्तक्षेपाबाबत बोलत राहील.
पंतप्रधान मतदानाच्या काळात परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून प्रचार करतात. ती बाब आयोगाला दिसत नाही का, असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला.