West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमध्ये 4 मिनिटांत अचानक घटलं मतदान! TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:56 AM2021-03-27T11:56:25+5:302021-03-27T12:12:35+5:30
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. (West Bengal Election)
कोलकाता - पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र, यातच मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात तृणमूल काँग्रेसनेनिवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी अचानक कमी झाल्याने तृणमूल काँग्रेसने ही तक्रार केली आहे. (West Bengal assembly elections TMC compalaint to ec over voter turn out assembly elections 2021 phase 1 voting)
टीएमसीने निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या टक्केवारीत गडबड झाल्याचे म्हणत लेखी तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे, की कांठी दक्षिण (216) आणि कांठी उत्तर (213) मतदान केंद्रांवर सकाळी 9.13 वाजता मतदानाची टक्केवारी प्रत्येकी 18.47% आणि 18.95% होती. मात्र, चार मिनिटांनंतर 9.17 वाजता ही टक्केवारी कमी होऊन 10.60% आणि 9:40 टक्क्यांवर आली आहे. ही गडबड आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी.
यापूर्वी, तृणमूल काँग्रेसने झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यांत भाजपवर मतदान प्रभावीत केल्याचा आरोप केला होता. टीएमसीने झारग्राममधील बूथ क्रमांक 218 वर भाजप कार्यकर्त्यांनी ईव्हीएम खराब केल्यासंदर्भात आणि पश्चिम मेदिनीपूरच्या गारबेटा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 167 वर मतदारांना बूथमध्ये जाऊ न दिल्याचा आरोप केला होता. टीएमसीने आरोप केला आहे, की निवडणूक अधिकारीदेखील त्यांना सहकार्य करत आहेत.
तथापी, आज दुपारी 12 वाजता लोकसभेतील टीएमसी संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंद्योपाध्याय आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वात 10 खासदारांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची कोलकाता येथे भेट घेणार आहे.
बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर?
मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात -
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 21 महिलादेखील आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकांत या 30 जागांपैकी 27 ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.