कोलकाता - पश्चिम बंगालचे नव्याने नामकरण होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पश्चिम बंगालच्या नामकरणाचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करून घेतले आहे. यानुसार पश्चिम बंगालचे ''बांगला'' असे नामकरण करण्यात येणार आहे. ममता सरकारने हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. आता गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यास पश्चिम बंगालचे बांगला असे नामकरण होईल. याआधी 29 ऑगस्ट 2016 रोजी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव बंगालच्या विधानसभेत मंजूर झाला होता. या प्रस्तावामध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून इंग्रजीत बंगाल, बंगाली भाषेत बांगला आणि हिंदीत बंगाल करावे असे निश्चित करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे देता येणार नसल्याची सबब केंद्र सरकारने दिली होती. तसेच ममत बॅनर्जी यांनी राज्यासाठी कोणतेही एक नाव निश्चित करावे, असेही केंद्राने सुचवले होते. त्यानंतर पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे विधेयक आज पश्चिम बंगालच्या विधानसभेत मांडण्यात आले. तसेच हे विधेयक मंजूर करण्यात आले. आता हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूर केल्यास पश्चिम बंगालचे नाव बांगला असे होणार आहे.