कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर, समशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यांपैकी, भवानीपूर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी 57 टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनिवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल टक्कर देत आहेत. ममता यांना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. (West Bengal Bhabanipur Assembly bypoll who winning tmc mamata banerjee bjp priyanka tibrewal)
टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल आणि सीपीएमच्या श्रीजीव बिस्वास यांचा सामना करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झालेल्या ममता यांना मुख्यमंत्रीपदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा गड मानला जातो, त्या येथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
प्रियंका टिब्रेवाल यांचं कोलकाता उच्च न्यायालयाला पत्र -भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. यात, "भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे".