पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील दोमोहोनीजवळ गुरुवारी बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वेचे बरेच डबे रुळावरून घसरल्याचे आणि बचाव कर्मचारी प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न करताना माध्यमांवरील व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून असल्याचे समजते.
गुवाहाटी येथील ईशान्य प्रांतीय रेल्वे (NFR)च्या प्रवक्त्याने सांगितले की, NFRच्या अलीपूरद्वार विभागांतर्गत येत असलेल्या भागात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अलीपूरद्वार जंक्शनपासून 90 किलोमीटरहून अधिक अंतरावर हा अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, "अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे." भारतीय रेल्वेने 03564 255190, 050 34666, 0361-273162, 2731622, 2731623 हे हेल्पलाइन क्रमांकदेखील जारी केले आहेत, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून रेल्वे अपघातासंदर्भात माहिती घेतली. नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेचे चीफ पीआरओ गुनीत कौर यांनी सांगितले की, बचाव कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे. आमच्या पथकांनी प्रभावित झालेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि वाचविले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातासंदर्भात स्थितीचा माहित घेतला. माझ्या संवेदना शोकाकूल कुटुंबीयांसह आहेत. परमेश्वर जखमींना लवकरात लवकर बरे करो.