नवी दिल्ली – कोलकाता(Kolkata) मच्छिपारा परिसरात तृणमूल काँग्रेस(Trinamool Congress) च्या नेत्याच्या पत्नीसोबत कथित गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी भाजपाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक भाजपा नेत्याने या महिलेला छेडलं असता तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेत तात्काळ भाजपा(BJP) नेत्याला अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री जेव्हा महिला औषध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा नेता आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाजपा नेत्याच्या घरात घुसून त्याला अटक केली. या भाजपा नेत्यावर संबंधित महिलेशी छेडछाड आणि एका स्थानिक क्लबमध्ये तोडफोड केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भाजपा नेत्याने आरोप फेटाळले
भाजपा नेते सजल घोष यांनी दावा केलाय की, मला कुठल्याही गुन्ह्याविना पोलिसांनी अटक केली आहे. सजलच्या वडिलांनीही सजलवरील आरोप खोटे असून त्याचा पोलिसांनी अटक केल्याचं सांगितले. तर पोलिसांच्या या कारवाईविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
घरात घुसून भाजपा नेत्याला अटक
मोचीपारा ठाण्याचे पोलीस दुपारी सजल घोषच्या अटकेसाठी त्यांच्या घरी पोहचली आणि चहुबाजूने घराला वेढा दिला. त्यानंतर पोलिसांनी घोष यांना घराबाहेर येण्यास सांगितले. परंतु ते बाहेर आले नाहीत. त्यानंतर दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये घुसले आणि सजल घोषला अटक करण्यात आली. सजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तोडफोड आणि छेडछाडीचा दोन विविध आरोप लावण्यात आले आहेत. परंतु सजल आणि भाजपाकडून दोन्ही आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं चित्र होतं. केंद्रीय मंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. कुठल्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आणायची असा चंग केंद्रीय नेतृत्वाने बांधला होता. परंतु ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाची दाणादाण उडाली. भाजपाच्या जागेत वाढ झाली असली तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना न बसला डाव्या पक्षांना बसला. तर ममता बॅनर्जी पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत विराजमान झाल्या. त्यामुळे भाजपा आणि टीएमसीमध्ये पश्चिम बंगालमध्ये वारंवार वादाचे प्रसंग घडत असतात.