कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊन आता जवळपास वर्ष होत असले तरी अनेकविध मुद्द्यांवरून तेथील राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा मोठा पराभव करणारे भाजप नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्या एका कृतीमुळे ते भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप मजबूत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. मात्र, अशातच आता भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याची माहिती मिळाली आहे. भाजपने पाच मंडल अध्यक्षांची नावे दिल्यानंतर लगेचच ते ग्रुपमधून लेफ्ट झाल्याचे सांगितले जात आहे. याआधी भाजपचे मोयनाचे आमदार अशोक दिंडा यांनी ग्रुप सोडला होता.
निष्ठावंत साहेब दास यांचीही ग्रुपला सोडचिठ्ठी
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले की, सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना सांगितले होते की ते राज्य स्तरावर काम करत असताना त्यांना जिल्हा संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सक्रीय व्हायचे नाही. भाजप तमलूक संघटनेचे उपाध्यक्ष व अधिकारी निष्ठावंत साहेब दास यांनीही ग्रुपला सोडचिठ्ठी दिली आहे. दास यांनी यावर खुलासा दिला आहे. एका पार्टी कार्यक्रमात आपला सेलफोन हरवला असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत कलह देखील आता समोर येऊ लागलाय. मजुमदार यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी त्यांच्यावर केलेल्या ‘अनुभव शुन्य’ असल्याच्या आरोपावर मौन सोडले. मला बंगाल भाजपचे अध्यक्ष बनवताना खासदार म्हणून अडीच वर्षांचा अनुभव होता. बंगाल भाजपचे अध्यक्ष झाल्यावर घोष यांना फक्त सहा महिन्यांचा अनुभव होता, असा टोला मजुमदार यांनी लगावला.