कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जय श्रीराम बोलण्यावरुन हा वाद रंगलेला असताना आता या राजकीय संघर्षाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सुरु केलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हावडानजीक बाली खाल येथे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन हनुमान चालीसा पठण केलं.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष ओम प्रकाश आणि प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपाच्या या हनुमान चालीसा पठणामुळे काही तास रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. यावर बोलताना युवा मोर्चाचे अध्यक्ष ओमप्रकाश म्हणाले की, जेव्हा एका धर्माचे लोक शुक्रवारच्या दिवशी रस्त्यावर उतरुन नमाज पठण करु शकतात मग हनुमान चालीसा पठण का होऊ शकत नाही? आता हावडामध्ये प्रत्येक मंगळवारी विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं जाईलं असं त्यांनी सांगितले.
बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं होतं की, आता राज्यात आपले नारे जय श्रीराम आणि जय महाकाली असतील. तर भाजपाला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यागाचे नाव हिंदू, इमानदारी म्हणजे मुस्लीम, प्रेमाचे प्रतीक ख्रिश्चन आणि बलिदानाचे नाव शिख असून यातून आपला हिंदुस्तान तयार झाला आहे. या हिंदुस्तानाची रक्षा आपल्याला करायची आहे. जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जायेगा, हीच तृणमूलची घोषणा टोला भाजपाला लगावला होता.
तसेच बंगालमधील चंद्रकोण येथील आरामबाग येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होतं. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली होती. त्या गाडीतून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला भाजपाच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रत्युत्तर देण्यात आलं. 'जय श्रीराम' च्या घोषणांनी दीदी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात, असं कॅप्शनही देण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपा या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.