TMC Candidates: आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होत आहेत. पश्चिम बंगालमध्येही लोकसभेसोबत भगवानगोला आणि बारानगर, या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. यासाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) शुक्रवारी (29 मार्च) आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. टीएमसीने भगवानगोला येथून रयत हुसैन आणि बारानगरमधून अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच सायंतिका बॅनर्जीने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पण, आपण टीएमसीसोबतच राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. दरम्यान, यापूर्वी सायंतिकाचा बांकुरा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यानंतरही ती सातत्याने जिल्ह्यात आपली कामे करू लागली. याचेच फळ म्हणून आता सायंतिकाला लोकसभेऐवजी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.
पोटनिवडणूक का होत आहे?भगवानगोला विधानसभेच्या जागेवर 7 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे, तर बारानगर येथील पोटनिवडणुकीसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. बारानगर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तपस रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. भाजपने तपस रॉय यांना लोकसभा निवडणुकीत कोलकाता उत्तरमधून उमेदवारी दिली आहे. तर, भगवानगोला ही जागा टीएमसीचे आमदार इद्रिस अली यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.