jay shah icc chairman : बीसीसीआय सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ते १ डिसेंबर २०२४ पासून आपल्या पदाचा कारभार सांभाळतील. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली अन् राजकारण तापू लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याने शाह यांच्या पदासह जबाबदारीतही मोठी वाढ झाली आहे. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र असल्याने त्यांच्यावर विरोधक तोंडसुख घेत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांचे अभिनंदन करताना टोला लगावला.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना डिवचले. केंद्रीय गृहमंत्री, अभिनंदन. तुमचा मुलगा राजकारणी झाला नाही, पण ICC चा अध्यक्ष झाला आहे. हे पद राजकारण्यांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. तुमचा मुलगा खरोखरच खूप शक्तिशाली झाला आहे आणि त्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
दरम्यान, आयसीसीचे मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी २० ऑगस्ट रोजी पुन्हा आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार कळवला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. शाह हे एकमेव उमेदवार असल्याने आणि त्यांची जागतिक क्रिकेटवर असलेली पकड पाहता त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला. त्यांनी २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ठोस पावले टाकली, असे आयसीसीने एका निवेदनात सांगितले. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.