Mamata Banerjee On Alliance : काही दिवसांपूर्वीच बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी विरोधकांकडून आघाडीचा प्रयोग केला जात आहे. पण या बैठकीच्या काही दिवसांनंतरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षावर टीका केली. केंद्रात भाजपच्या विरोधात मोठी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्या कृतीमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी बिहारमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान एका रॅलीला संबोधित करताना म्हटले, "आम्ही केंद्रात भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु बंगालमध्ये काँग्रेस आणि सीपीआयएम भाजपला मदत होईल असे काम करत आहे."
कॉंग्रेसचे प्रत्युत्तर दरम्यान, मागील १० दिवसांत दुसऱ्यांदा असे झाले आहे की, ममता बॅनर्जी यांनी भाजपशी गुप्त करार केल्यावरून काँग्रेस आणि सीपीआयएमवर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, "भाजपविरुद्धच्या लढाईत टीएमसीच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. भाजपविरुद्धच्या लढाईत टीएमसीने एवढ्या वर्षात काय भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहिती आहे." या प्रकरणी बोलताना भाजपने राज्यातील सीपीआयएम आणि काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचा करार केला नसल्याचे म्हटले. सीपीआय (एम), काँग्रेस आणि टीएमसी ही एकच 'बोट' असल्याची टीका भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केली.