mamata banerjee : कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच राज्यातील बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मागील काही दिवसांमध्ये अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सततच्या या घटनांमुळे विरोधक कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र लिहिले. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. देशभरात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रोजच्या वाढत्या घटनांमुळे मी तुमचे लक्ष वेधत आहे. अनेक प्रकरणांमध्ये अत्याचारासह हत्या झाल्याचे उघडकीस आले. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरात दररोज बलात्काराच्या जवळपास ९० घटना घडत आहेत हे खूपच धक्कादायक आहे, असे त्यांनी नमूद केले.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, सततच्या बलात्काराच्या घटनांमुळे समाजाचा आणि देशाचा आत्मविश्वास तसेच विवेक डगमगत चालला आहे. महिलांना निर्भय आणि सुरक्षित वाटावे यासाठी अशा घटनांना आळा घालणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा घृणास्पद गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. केंद्रीय कायद्याद्वारे अशा गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावर सर्वसमावेशकपणे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याचाही विचार प्रस्तावित कायद्यात केला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळेल. अशा प्रकरणांची सुनावणी शक्यतो १५ दिवसांत पूर्ण व्हायला हवी.
दरम्यान, कोलकाता येथील घटनेने देशभरात संतापाचे वातावरण आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. हे प्रकरण तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता संतापजनक विधान केल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ. घोष हे कोलकाता येथील त्याच आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते, जिथे ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.