नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये 108 नगरपालिकांच्या 2 हजार 171 प्रभागांसाठी मतदान सुरू आहे. याच दरम्यान उत्तर 24 परगानामध्ये मतदानावेळी तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. भाजपा नेते अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आज मतदानावेळी हाणामारी झाली आहे. येथील प्रभाग नऊमध्ये दोन ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यभर अशीच परिस्थिती आहे. पोलीस भाजपा कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. त्यांना मतदान करू दिले जात नाही अशी माहिती दिली आहे.
"येथे फक्त पोलीस आणि गुंडच मतदान करत आहेत. मतदार मतदान करण्यास घाबरत आहेत, विशेषत: बंगाली लोकसंख्या, ज्यांना मतदान करू दिले जात नाही. मुस्लिमांनाही मतदान करता येत नाही. येथील पोलीस गांधीजींच्या तीन माकडांपैकी एकाची भूमिका निभावत आहेत" असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी म्हटलं आहे. अशा तुरळक घटना घडूनही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 2171 प्रभागात 33.52 टक्के मतदान झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही तुरळक घटना वगळता, आतापर्यंत मतदान शांततेत पार पडल्याचं म्हटलं आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. काही भागांतून मतदानात अडथळे येत असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर आम्ही कारवाई केली असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टीएमसीने भाजप नेत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
अनेक बूथबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. सकाळपासूनच लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी पोहोचले. या निवडणुकीत सुमारे 95.6 लाख मतदार 8,160 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची स्पर्धा अनेकांशी आहे. तिकिटांच्या कमतरतेमुळे टीएमसीचे अनेक नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.