INDIA Opposition Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. ०१ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. तत्पूर्वी ०१ जून रोजी इंडिया आघाडीने सामील सर्व घटक पक्षांची एक बैठक बोलावली असून, ती महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या या बैठकीला जाण्यास नकार दिला आहे.
मतमोजणी विषयासंदर्भात विविध दृष्टिकोनांतून विश्लेषण करणे हा ०१ जूनच्या बैठकीचा उद्देश आहे. लोकसभा निवडणुकांच्या ०४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर जो निकाल लागेल, त्यामुळे काय परिस्थिती उद्भवू शकते, त्यावर काय उपाययोजना करता येईल, अशा विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मतमोजणीच्या आधीच विरोधी पक्षांच्या आघाडीतील ऐक्य धोक्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसने या बैठकीत सामील होण्यास नकार दिला आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी १ जूनच्या बैठकीचे निमंत्रण इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना दिले होते. तृणमूल काँग्रेसलाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते. परंतु, अखेरचा सातवा टप्पा ०१ जून रोजी असून त्या दिवशी बंगालमध्ये नऊ जागांसाठी मतदान आहे. त्यामुळे दिल्लीत त्या दिवशी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आम्ही सामील होऊ शकत नाही, असे तृणमूलने कारण पुढे केले आहे. सध्या त्या नऊ जागांवर तृणमूलचे खासदार असून तिथे आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पक्षाने सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ०२ जून रोजी तिहार तुरुंगात पुन्हा रवानगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनाही इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहाता यावे म्हणून ०१ जून रोजी बैठक आयोजिण्यात आली आहे. या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने इंडिया आघाडीची ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे.