नवी दिल्ली: नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात (West bengal Assembly Election 2021) सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. याचपार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ममत बॅनर्जी व्हीलचेअरवरून कोलकताच्या गांधी मूर्तिजवळ पोहचल्या. त्यानंतर गांधी मूर्तिपासून हाजरापर्यत 'रोड शो'ला सुरुवात झाली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.
सदर हल्ल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून त्या वाहनात शिरण्याच्या बेतात असतानाच वाहनाचा दरवाजा त्यांच्या पाठीमागून ढकलण्यात आला. त्यात त्या जखमी झाल्या. हा अपघात नसून, हल्लाच असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी काल केला होता.
ममता बॅनर्जी यांच्या पायाला १० मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली हाेती. त्यावेळी नंदीग्राममध्ये बिरुलिया बाजार येथे मोठा जमाव ममता बॅनर्जींकडे चालून गेला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आराेप ममता बॅनर्जी यांनी केला होता. याबाबत राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाने अहवाल मागितला होता. ही घटना नेमकी कशी घडली आणि यामागे कोण असावेत, याबाबत सविस्तर माहिती आयोगाने मागविली आहे. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. सरकारने सादर केलेला अहवाल अर्धवट असून, पुरेशी माहिती त्यात नसल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. अहवालात मोठ्या जमावाचा उल्लेख आहे. मात्र, संबंधित चार-पाच जणांचा उल्लेख नाही. तसेच या घटनेचा स्पष्ट व्हिडीओदेखील नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला
ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळ्यांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे.