कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. येथे भारतीय जनता पक्षाची जबरदस्त सक्रियता आणि बंडखोरांमुळे ममता चिंतित आहेत. मात्र, यातच ममता एका संगीत कार्यक्रमात हसत्या-खेळत्या अंदाजात दिसून आल्या. लोक कलाकारांच्या या कार्यक्रमात त्या प्रसिद्ध संथाली डान्सर बसंती हेम्ब्रम यांच्यासोबत डान्स करताना दिसून आल्या. (West Bengal Assembly Elections 2021)
या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी अनेक लोककलावंतांना सन्मानित केले. यात संगीतकार, गायक आणि नृत्य कलाकारांचाही समावेश होता. बसंती हेम्ब्रम यांना सन्मानित करताना ममतांनी त्यांच्यासोबत नृत्यही केले. यावेळी, बसंती ममताना नृत्याच्या काही स्टेप्स शिकवतानाही दिसल्या. यावेळी ममता बॅनर्जींनीही नृत्याचा आनंद घेतला.
यावेळीही ममतांनी भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना भाजपवर हल्ला चढवला. यावेळी भाजपच्या नावाचा उल्लेख न करता, 'बंगालचे रुपांतर कधीही गुजरातमध्ये केले जाऊ शकणार नाही. बंगालनेच देशाला राष्ट्रगीत आणि 'जय हिंद'ची घोषणा दिली.' भाजपकडून सातत्याने बंगालमध्ये गुजरात मॉडेल आणण्याचे बोलले जात आहे, त्यालाच मुख्यमंत्री ममतांनी उत्तर दिले आहे.
ममतांनी भाजपला पुन्हा एकदा 'आऊटसायडर'चा टॅग लावत, 'एक दिवस संपूर्ण जग बंगालला सॅल्यूट करेल. बंगालची माती जीवनाचा स्रोत आहे. आपल्याला या मातीचे रक्षण करायचे आहे. असे कुणीही नाही, जे बाहेरून येतील आणि म्हणतील, की आम्ही याला गुजरात बनवू,' असे ममता म्हणाल्या.