सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा त्यावरील उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, लसींसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तसंच लसींची कमतरता दूर करण्यासाठी लवकरात लवकर लसी आयात केल्या पाहिजे, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. या पत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची मागणी केली आहे.
"बंगालच्या १० कोटी आणि देशाच्या १४० कोटी नागरिकांसाठी लसीची आवश्यकता आहे. सध्या छोट्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांकडून लस आयात करू सकतो. तसंच यासाठी तज्ज्ञांचा आणि वैज्ञानिकांचा सल्लाही घेतला जाऊ शकतो," असं ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलं आहे.
"आपण आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांना भारतात फ्रेन्चायझी उघडण्यासाठी आमंत्रित करू शकतो. तसंच आपल्या देशातील कंपन्याही फ्रेन्चायझी मोडवर काम करू शकतात. जेणेकरून अधिक लस उत्पादन करता येईल. आम्ही बंगालमध्ये कंपन्यांना फ्रेन्चायझी सुरू करण्यासाठी जमिन आणि सहकार्य देण्यास तयार आहोत," असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.