नवी दिल्ली - भाजपानं सरकार बनवलं परंतु त्यांच्याकडे जनादेश नाही. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच वेळ आली जेव्हा भाजपाला एकट्याच्या बळावर सरकार बनवता आलं नाही असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
शनिवारी ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी म्हटलं की, २०२४ मध्ये मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजपा सत्तेत आलं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये भाजपानं त्यांना झुकतं माप दिलं. राजकीयदृष्ट्या मजबुरीमुळे पक्षपाती बजेट सादर केले. ज्यातून विरोधकांचं सरकार असलेल्या राज्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजपा पश्चिम बंगालचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या कुणी नेत्याने आसामचं विभाजन करण्यास सांगितले, कुणी बिहारचं विभाजन करण्याची भाषा केली. मी त्यांना गँग बोलणार नाही कारण हा असंसदीय शब्द आहे त्यामुळे मी त्यांना तुकडे तुकडे मंच बोलेन असा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला.
नीती आयोगावर साधला निशाणा
दरम्यान, नीती आयोग हटवा, नियोजना आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोगाची रचना होती त्यातून देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कल्पना होती. नीती आयोगाला कोणतेही अधिकार नाहीत. हे राज्य सरकारांशी समन्वयाने काम करत नाही असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. इंडिया आघाडीचे इतर अनेक मुख्यमंत्री NITI आयोगाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत यावर ममता बॅनर्जींनी 'मी केवळ बंगालचाच नाही तर इंडिया आघाडी शासित राज्यांचाही मुद्दा उपस्थित करणार आहे असं भाष्य त्यांनी केले.
अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.