कोलकाता - पश्चिम बंगालच्या राजकारणात मंगळवारी नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीभाजपा खासदाराच्या घरी त्यांना भेटायला पोहचल्या. भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत राय महाराज यांनीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांचं स्वागत केले. ममता बॅनर्जी आणि भाजपा खासदार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा घडली त्याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. परंतु या भेटीनं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अनंत राय महाराज हे उत्तर बंगालच्या राजकारणातील मोठा चेहरा आहेत. ज्याठिकाणी भाजपाने वेगाने पाय रोवले आहेत. अनंत महाराज उत्तर बंगालच्या कूचबिहार या राज्याची मागणी करणाऱ्या कूचबिहार पीपुल्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. स्वत:ला ग्रेटर कूचबिहारचे महाराज सांगणारे अनंत यांना भाजपाने १ वर्षापूर्वी पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले. पश्चिम बंगालमधून भाजपाच्या तिकिटावर राज्यसभेवर पोहचणारे ते पहिलेच नेते आहेत.
आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी जात अनंत महाराजांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनंत महाराजांच्या घरी भेट दिली. त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं होते. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील त्यांना भेटायला त्यांच्या घरी पोहचल्या. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मागील सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले निशिथ प्रामाणिक हे अनंत महाराजांच्या जवळचे मानले जातात. ते राजवंशी समुदायातून येतात.
राजवंशी समुदायाची ताकद
पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्क्याहून अधिक राजवंशी समुदाय आहे. राजवंशी समुदाय अनुसूचित जाती समुहातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली मानला जातो. राजकीय गणितानुसार, उत्तर बंगालच्या २० विधानसभा क्षेत्रात राजवंशी समुदायातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. मागील २०१९ च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपाने चांगली कामगिरी केली परंतु यंदाच्या निवडणुकीत कूचबिहार लोकसभा जागेवर भाजपाचा पराभव झाला.
अनंत महाराजांनी व्यक्त केली होती नाराजी
लोकसभा निवडणुकीत भाजपानं कूचबिहार लोकसभा जागेवरून ज्या उमेदवाराची घोषणा केली त्यांचे नाव ऐकताच अनंत महाराज यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपाच्या राज्य नेतृत्वानं मला अडगळीत टाकलं आहे. कुठलाही संपर्क साधला नाही. उमेदवारांच्या निवडीवरही चर्चा केली नाही असं विधान अनंत महाराजांनी केले होते.