नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली. 45 मिनिटांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील विविध योजनांसाठी ममतांनी पंतप्रधान मोदींकडे 100,968.44 कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, आता या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काही लोक याला राजकीय सेटिंग म्हणत आहेत, तर काही लोक शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या कारवाईची भीती सांगत आहेत.
काँग्रेसने म्हटले की, 'तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर सीबीआय आणि ईडीच्या कारवाया सुरू आहेत. ममता बॅनर्जींचा दिल्ली दौरा हा फिक्सिंगचा एक भाग आहे.' तर, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला. त्यांनी ट्विट केले की, 'पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात काहीतरी सेटींग झाल्याची कोलकात्यात चर्चा सुरू आहे. तसे असेल तर तृणमूल काँग्रेसचे मारेकरी आणि चोर असेच मोकळे फिरतील का? अशी कोणतीही सेटिंग झाली नसल्याची आम्हाला खात्री करुन द्यावी.'
2016 पासून मॅच फिक्सिंग सुरू आहे: काँग्रेसया भेटीवर काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. बंगाल काँग्रेसचे प्रवक्ते रित्जू घोषाल यांनी आरोप केला की, '2016 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपासून ही मॅच फिक्सिंग सुरू आहे. ईडीने कोळसा घोटाळ्याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची केवळ दोनदा चौकशी केली, तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दररोज त्रास दिला जात आहे.'